पुणेक्रिडामनोरंजन

विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लिग’चे चषक, जर्सी अनावरण उत्साहात

भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये अभिनेत्यांची मांदियाळी ; आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

पुणे दि.०२ : सांगली येथे पहिल्यांदाच होणार्‍या विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लिग स्पर्धेच्या जर्सी तसेच ट्रॉफी अनावरण व खेळाडू निवड सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. धनकवडी येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आयपीएलच्या धर्तीवर व्हीएमपीएलच्या सोहळ्यास मराठी चित्रपट कलाकारांची मांदियाळी जमली होती. भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली व अभिजित कदम मेमोरियल फौंडेशनच्यावतीने १५ व १६ ऑगस्ट रोजी सांगलीतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एसबीजीआय टर्फमध्ये प्रकाश झोतात या स्पर्धा होणार आहेत. या सोहळ्यास सांगलीचे राजे विजयसिंहराजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन, महाराष्ट्र डिजिटल मिडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, ज्येष्ठ अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते संजय जाधव, सौरभ गोखले, शशांक केतकर, हार्दिक जोशी, प्रथमेश परब, धनंजय पवार, सोनाली पाटील यांच्यासह बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. ‘सांगलीत’ जावून आम्ही क्रिकेट खेळणार आणि मनमुराद आनंद लुटणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कला, राजकारण, समाजकारणासह नाट्य व क्रीडापंढरी असलेल्या सांगलीला कुस्ती, कबड्डीसह क्रिकेटचाही इतिहास आहे. दुबई, थायलंड पाठोपाठ आता सांगलीत पहिल्यांदाच विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट तिसरी लिग सांगलीत आयोजित करण्याचा निर्धार सांगलीचे रणजीपटू खेळाडू युवा अभिनेते, दिग्दर्शक विज्ञान माने यांनी केला होता. त्यानुसार दै. जनप्रवास, विज्ञान माने स्टुडिओज व सचिनभाऊ कदम वेल्फेअर फौंडेशनच्यावतीने या लिगचे आयोजन केले आहे. त्यातून या स्पर्धेचे संपूर्ण पालकत्व भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजित कदम यांनी स्वीकारत अभिजित कदम मेमोरियल फौंडेशनतर्फे त्याला पाठबळ दिले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली १५ व १६ ऑगस्ट रोजी मिरजेतील संजय भोकरे कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट येथील एसबीजीआय टर्फ क्रिकेट मैदानावर सायंकाळी प्रकाश झोतात होणार्‍या स्पर्धेत सुमारे ६० हून अधिक कलाकार क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. यात सुमारे सात संघांचा सहभाग असेल.
सांगली जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत डॉ. विश्वजित कदम यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी अभिजित कदम मेमोरियल फौंडेशनतर्फे सर्वतोपरी सहकार्याची जबाबदारी स्वीकारली आहे असे यावेळी सांगितले. सोबतच जनप्रवास समुहाच्यावतीने संजय भोकरे यांनी संपूर्ण पाठबळ देत स्पर्धा आयोजनासाठी विज्ञान माने स्टुडिओजसोबत पुढाकार घेतला आहे. सोबतच सचिनभाऊ कदम वेल्फेअर फौंडेशनचे सर्वेसर्वा सचिनभाऊ कदम, नितीश चव्हाण, धनंजय पोवार, पृथ्वीक प्रताप, सागर पाठक यांनी संयोजनासाठी हातभार लावला आहे.

याअंतर्गत स्पर्धेच्या ट्रॉफी, जर्सी व खेळाडूंच्या निवडीचा भव्य सोहळा भारती विद्यापीठ प्रांगणात पार पडला. प्रारंभी कलाकारांचे स्वागत व प्रास्ताविक अभिनेते विज्ञान माने यांनी केले. थायलंड येथे मागील वर्षी झालेल्या मराठी सेलिब्रिटी प्रिमियर लिगचा विजेता, उपविजेता संघ तसेच मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बॅटस्मन आदी खेळाडूंना डॉ. कदम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर विज्ञान माने यांनी प्रास्तविकात लिग विषयी माहिती दिली. याप्रसंगी देऊळबंद 2 चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाबद्दल प्रवीण तरडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रवीण तरडे म्हणाले, माझ्या जडणघडणीत भारती विद्यापीठाचा मोठा हातभार आहे. शिक्षणमहर्षी डॉ. पतंगराव कदम यांनी मला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली, त्यामुळे मी आज येथे आहे. परिणामी जेथे डॉ. कदम आणि डॉ. विश्वजित कदम तेथे कोणतीही तडजोड नाही. त्यांच्या सांगलीत आणि विशेषत: सांगलीचा कप्तान म्हणून मला खेळण्याची संधी मिळाली आहे.

डॉ. कदम म्हणाले, सेलिब्रेटी लीगच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद केली जाईल असे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. भारती विद्यापीठ दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडागुणांना वाव, प्रोत्साहन देण्यासाठी सदैव अग्रभागी असते. अव्वल दर्जाचे कुस्ती संकुल उभा करून महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीगीरांना प्रोत्साहन दिले आहे. सांगलीकरांसाठी ही स्पर्धा पर्वणी असेल. आभार अभिनेत्री सोनाली पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन विनोद वणवे यांनी केले.

आयपीएलच्या धर्तीवर दिमाखदार सोहळा
आयपीएलच्या धर्तीवर व्हीएमसीसीएलच्या ट्रॉफी व खेळाडूंच्या जर्सी अनावरणाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. स्वागत कमान ते ट्रॉफीचे फुग्यांसह आतषबाजीत उद्घाटन करण्यात आले. त्याचसोबत कलाकारांच्या सात संघांच्या जर्सीचे कप्तानांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

हे कलाकार सांगलीत क्रिकेटसाठी मैदानात उतरणार
या स्पर्धेत ज्येष्ठ अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते संजय जाधव, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, शशांक केतकर, हार्दिक जोशी, गौरव मोरे, प्रथमेश परब, धनंजय पवार, प्राजक्ता गायकवाड, सोनाली पाटील, नितीश चव्हाण (आज्या), प्रथमेश परब (दगडू), आकाश ठोसर (परशा), अभिनय बेर्डे, विशाल निकम, हर्षद हटकरी, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, वनिता खरात, प्रख्यात नृत्यांगना गौतमी पाटील, राधा पाटील आदी ६० हून अधिक अभिनेते, अभिनेत्री मैदानात उतरून फटके बाजी व गोलंदाजीसह क्षेत्ररक्षण करणार आहेत. यासोबतच बिगबॉस फेम रिलस्टार धनंजय पोवार यांच्यासह सुमारे १५० हून अधिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध रिलस्टार्स, इन्फ्लुएन्झर्सचे संघही स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button