पुणेमनोरंजन

पुण्यात भीमथडी जत्रेचा आज शेवटचा दिवस- ५ दिवसांत लाखो पुणेकरांनी लुटला आनंद, ‘भीमथडी सिलेक्ट’, ‘बलुतेदार रांगोळी’ आणि ‘शेतकरी दालना’वर पुणेकरांच्या उड्या

पुणे:- ता. 25 डिसेंबर.

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व शारदा महिला संघ यांच्या सयुंक्त विद्यमाने महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी भीमथडी जत्रा पुण्यातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर दिमाखात सुरू असून आज या जत्रेचा शेवटचा दिवस आहे.
मागील ५ दिवसांत एक लाखांपेक्षा जास्त पुणेकरांनी या जत्रेला भेट देऊन खरेदी आणि खाद्यसंस्कृतीचा आनंद लुटला आहे.

*​या वर्षी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण* ठरत आहे ते प्रवेशद्वारावरील मुघल गार्डन आणि १२ व्या शतकातील महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ‘बलुतेदार पद्धती’आधारित माहितीपूर्ण रांगोळ्यांचे सादरीकरण. यामध्ये लोहार, कुंभार, चांभार, सोनार, शिंपी (दर्जी), न्हावी, माळी, पुरोहित, ग्राम सेवक (महार) यांच्या भूमिका आणि त्यांना मिळणारा मोबदला (बलुता) यांचा इतिहास मांडण्यात आला आहे. तसेच २१ व्या शतकात या व्यवसायांचे झालेले आधुनिक रूपांतर—जसे की फॅशन डिझायनिंग, लँडस्केपिंग, मशिनरी आणि सुरक्षा सेवा इत्यादी अतिशय प्रभावीपणे दर्शविण्यात आले असून हे पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.

​भीमथडी सिलेक्ट, शेतकरी दालन आणि महिला बचत गट विभागात पुणेकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. माहेर संस्थेच्या मेणबत्त्या, राजस्थानच्या बांधणी साड्या, तेलंगणाच्या इकत साड्या, कर्नाटकातील खण साड्या, हैदर हँडीक्राफ्ट्सची चिकनकारी आणि अडीच लाखांचा लेहंगा, मध्य प्रदेशचे चंदेरी सिल्क, मिट्टी हबची शेणापासून बनलेली गादी, वारली पेंटिंग, महुवा लाडू इत्यादी वस्तूंना मोठी मागणी आहे.

तसेच शेतकरी दालनात जी आय मानांकन असलेली हळद, अंजीर, लाल पेरू, लाल व निळी केळी, जगातील पहिला बिनसाखरेचा गोड चहा, कोल्हापूर-सातारा येथील सेंद्रिय गुळ, १८ प्रकारची थालीपीठ, दीडशे प्रकारचे देशी बियाणे उपलब्ध आहेत.

*​भीमथडीची ‘खाऊ गल्ली’ खवय्यांच्या गर्दीने ओसंडून वाहिली* असून पुणेकरांनी व्हेज-नॉनव्हेज जेवणावर ताव मारला. त्यामध्ये कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, गावरान चिकन, चिलापी थाळी, सुका बोंबील, खेकडा थाळी, मटण लोणचे, मासवडी, उकडीचे मोदक, बाजरीची भाकरी, वांगे भरीत, खापरावरचे मांडे, खरवस, गव्हाचा चिक इत्यादी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र आहे.
​आज नाताळची सुट्टी आणि जत्रेचा शेवटचा दिवस असल्याने पुणेकर मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे. प्रशस्त पार्किंग, जेष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर आणि ‘नो प्लास्टिक झोन’ हे या वर्षीचे वैशिष्ट्य ठरले आहे. आज रात्री १० वाजेपर्यंतच ही जत्रा सुरू राहणार असून सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button